Skip to main content

पित्ताशयातील खडे

पित्ताशयातील खडे

पित्ताशयातील खडय़ांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. काय आहेत त्यावरच्या उपाययोजना?

डॉ. अविनाश सुपे |Updated: September 4, 2015 2:07 pm



बदलत्या जीवनशैलीमुळे आपले जीवनमान बदलले आहे. त्याच्या अनेक परिणामांपैकी एक म्हणजे पित्ताशयातील खडय़ांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. काय आहेत त्यावरच्या उपाययोजना?

हल्ली बऱ्याचदा असे रुग्ण येतात की ज्यांनी इतर कोणत्या तरी कारणांसाठी पोटाची सोनोग्राफी केली असताना त्यांच्या पित्ताशयामध्ये खडे आहेत असे निदान केले गेलेले असते. म्हणूनच आपण हे खडे का व कसे तयार होतात, त्यामुळे काय त्रास होऊ शकतो, हे टाळता येणे शक्य आहे का व त्यावर काय उपाय उपलब्ध आहेत हे समजावून घेऊ या.

पित्ताशयात खडे का होतात?

आपल्या शरीरात पित्तरसाची निर्मिती ही यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय (Gall bladder) नामक एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते, जिचे काम असते जास्त तयार झालेले पित्त साठवून ठेवणे व प्रत्येक जेवणाच्या वेळी ते पित्तनलिकेवाटे लहान आतडय़ात सोडणे. खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी याची गरज असते. हे पित्त जेवणानंतर ठरावीक प्रमाणामध्ये पचनक्रियेसाठी हा पित्तरस लहान आतडय़ात सोडला जातो. आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण (Oily food) जास्त झालं किंवा तंतुमय पदार्थाचं (fibre) प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात. हे खडे तीन प्रकारचे असतात

१. कोलेस्टेरोल (Cholesterol)

२. पिगमेंट pigment (बिलिरुबीनचे घटक)

३. मिश्र.

७०-८० टक्केरुग्णांमध्ये ते मिश्र असतात. अगदी लहान खडे पित्तनलिकेवाटे पित्तरसाबरोबर लहान आतडय़ात निघून जातात. पण त्यांचा आकार मोठा असेल तर ते पित्ताशयाच्या व पित्तनलिकेच्या अरुंद ठिकाणी अडकून राहतात व पित्ताशयाला सूज येऊन जंतूचा प्रादुर्भाव होतो.

हा त्रास कुणाला होऊ शकतो?

वैद्यकशास्त्रामध्ये पित्ताशयातील खडे हे फॅट, फर्टाइल, फीमेल ऑफ फोर्टी म्हणजे स्थूल देहाच्या चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात असे शिकवले जाते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण सहापटींनी जास्त असते. पाश्चात्त्य देशात व उत्तर भारतामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यांचा आहार, स्थूल शरीर, जाडेपणा, अतिस्थूलपणा, अति तूपकट, तेलकट खाणे, आहारात तंतुमय पदार्थ न घेणे, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभाव, वरचेवर फास्ट फूड किंवा जंक फूड असणे, या सर्व गोष्टींमुळे पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात. त्यामुळे गेल्या दोन-तीन दशकांत भारतातही याचे प्रमाण वाढत आहे. हल्ली हे खडे सर्व वयाच्या स्त्री-पुरुषांमध्ये आढळतात.

हा त्रास कसा ओळखावा?

सुरुवातीची लक्षणे अ‍ॅसिडिटीच्या त्रासासारखीच असतात. सुरुवातीला पोटाच्या वरच्या भागात थोडेसे उजवीकडे दुखायला लागते. गॅसेस होतात. मळमळ सुटते, जळजळ होऊ लागते, त्याबरोबरच एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतडय़ात नेणारा मार्ग अरुंद होतो व पित्तरस यकृत (लिव्हर)मध्ये साचू लागतो त्यातील बिलिरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळतात व काविळीची लक्षणे दिसू लागतात. याला अवरोधक कावीळ (Obstructive Jaundice) असे म्हणतात. पित्तखडय़ांमुळे होणाऱ्या काविळीबरोबर अंगाला खाज सुटते. पित्ताशयातील खडय़ांमुळे स्वादुपिंडदाहही होऊ शकतो.

पित्ताशयातील खडय़ाचे निदान

सोनोग्राफी, काही विशिष्ट रक्ततपासणी व एण्डोस्कोपी करून पित्ताशयातील दोष, अडकलेले खडे, पित्तनलिकेचा आजार इत्यादी गोष्टींविषयी पूर्ण माहिती मिळू शकते.

उपाय

एखाद्यास पित्ताशयाच्या खडय़ामुळे त्रास होत असेल आणि कावीळ नसेल तर शस्त्रक्रिया करून हे पित्ताशय काढून टाकता येते, ही शस्त्रक्रिया पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी (Laparoscopy) केली जाते. ती तज्ज्ञ, अनुभवी सर्जनकडून करणे. त्यामुळे रुग्ण दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमुळे फारशी गुंतागुंत निर्माण होत नाही व पोटावर टाके, जखमेत व्रण राहत नाही. ही शस्त्रक्रिया सोपी, सुलभ असते. यामध्ये खराब झालेले पित्ताशय व खडे काढून टाकतात. यानंतर त्या व्यक्तीला त्रास होत नाही. कारण पचनास लागणारा पित्तरस सरळ लहान आतडय़ात नियमित प्रमाणात येत राहतो.

जर एखाद्यास पित्ताशयाच्या खडय़ामुळे कावीळ असेल तर दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी किंवा ERCP करून, पित्तनलिकेतील खडे काढले जातात, दुर्बिणीद्वारे एक छोटेसे छेद करून पित्तनलिकेतील खडे काढता येतात व एक प्लास्टिकची नळी (stent) पित्तनलिकेत टाकून कावीळ कमी होते. पुन्हा होऊ नये म्हणून दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे उचित ठरते. काही रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लागते ज्यामध्ये पित्तनलिका ही लहान आतडय़ास जोडली जाते.

टाळण्यासाठी काय करावे?

१) जेवणातील तेल-तुपाचे प्रमाण (स्वयंपाकातील) योग्य प्रमाणात असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल, भातावर थोडे साजूक तूप (हे लोणी काढून घरी बनवलेले तूपच असावे) इतके चालेल. पनीर, खोबरे व शेंगदाण्याचाही वापर माफक प्रमाणात करावा.

२) तळलेले पदार्थ, फास्ट फूड वरचेवर खाऊ नये.

३) जेवणात रोज कोशिंबीर वा सॅलड घ्यावे.

४) चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळे अशी फळे खावीत.

५) रोज नियमित व्यायाम करावा. रोज एक तास चालायला जावे.

खडे विरघळण्यासाठी औषधे ?

पित्ताशयातील खडे विरघळण्याची काही औषधे उपलब्ध आहेत खरी, पण ती बरीच वर्षे घ्यायला लागतात. बरीच खर्चीक असतात व खडे विरघळण्याचे प्रमाण अनिश्चित असते. दुसरा धोका म्हणजे या अवधीत एखादा खडा अडकून काही दुष्परिणाम होणार नाहीत, असे सांगता येत नाही.

त्रास न होणारे खडे (Silent or asymptomatic stones)

पित्ताशयातील खडे असणाऱ्या ७०-८० टक्के रुग्णांना त्याचा काही त्रास होत नाही. त्यातले काही सोनोग्राफीमध्ये दिसतात. अशा खडय़ांना सायलेंट खडे म्हणतात. जर खडय़ांचा काही त्रास नसेल, ते लहान असतील व पित्ताशय जाड झाले नसेल तर असे खडे काढणे आवश्यक नसते. केवळ सोनोग्राफीमध्ये खडे आहेत म्हणून ते काढावेत हे गरजेचे नाही. त्यावर फक्त लक्ष ठेवावे व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावे. सोनोग्राफीच्या रिपोर्टने घाबरून न जाता जर खडय़ामुळे त्रास होत असेल तरच त्यावर शस्त्रक्रियेची गरज असते.

डॉ. अविनाश सुपे – response.lokprabha@expressindia.com

Comments

Popular posts from this blog

पायांच्या तळव्यांची आग होणे -

पायांच्या  तळव्यांची  आग  होणे  - - - - - कारणे  -- शरीरात  उष्णता  वाढणे,  आम्लपित्त  वाढणे,  पचनशक्ती  कमजोर  होणे,  मांसाहार  करणे,  पोट  साफ  नसणे.  जाग्रण  करणे.  इ. उपाय  -- १)  रात्री  झोपतेवेळी  पायांच्या  तळव्यांना  तुप  /  खोबरेल / तिळाचे  तेल   लावणे.  नंतर  काश्याच्या  वाटीने  घासणे.  तसेच  नाभीत  ( बेंबीत )  खोबरेल  तेल  घालणे. २)  नियमित  प्राणायाम  करा . सर्वच  आजार नष्ट  होतील. ३)  रोज  एक  चमचा  गुलकंद  खाणे . ४)  एक  कप  ताक  +  एक  चमचा  आवळापूड  +  थोडे  मीठ  मिक्स  करून  दोन  वेळा  पाच  दिवस  घेणे . ५)  सकाळी  एक / दोन  ग्लास  कोमट / गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  पिणे . ६) ...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पा...

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...